इस्लापूर सर्कलमध्ये ‘जलसमृद्ध किनवट’ अभियानाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद!
२ हजार भागीदारी विहिरींच्या पथदर्शी प्रकल्पासाठी प्राथमिक नोंदणी अर्जांचे वाटप

इस्लापूर : शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासह लोकसहभागातून जलसंधारणाला चालना देण्याच्या उद्देशाने शेतकरी संघटनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसहभागातून जलसमृद्ध किनवट’ अभियानाला इस्लापूर सर्कलमधील शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाची माहिती देत प्रस्तावित २ हजार भागीदारी विहिरींच्या पथदर्शी प्रकल्पासाठी इच्छुक शेतकऱ्यांना प्राथमिक नोंदणी अर्जांच्या प्रतींचे वाटप करण्यात आले.
इस्लापूर सर्कलमधील ज्येष्ठ शेतकरी नंदकुमार देसाई, राजू पाटील घोगरे, रंजीत जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे नेते जगदीश माने पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना अर्जांच्या प्रती वितरित करण्यात आल्या.
यावेळी अभियानाची संकल्पना, शासन आणि शेतकरी यांच्या सहभागातून विहिरींची निर्मिती, इच्छुक शेतकऱ्यांची प्राथमिक नोंदणी आणि भविष्यातील अंमलबजावणीचे नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ‘विहीर एक – फायदे अनेक’ या संकल्पनेतून शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यासोबतच भूजल पुनर्भरण आणि जलसंधारणालाही मोठी मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, हा प्रकल्प सध्या प्रस्तावित असून शासनाची मान्यता आणि संबंधित विभागांच्या तांत्रिक प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग निश्चित होणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी अभियानाची माहिती घेऊन प्राथमिक नोंदणी प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसहभागातून जलसमृद्ध किनवट — शेतकऱ्यांच्या सहभागातून जलसमृद्ध भविष्याकडे एक पाऊल!



