Uncategorized

किनवटच्या महिलांच्या बसला भीषण अपघात; दोन महिलांचा जागीच मृत्यू

हैदराबादकडे सत्संगासाठी जाताना आरमूरजवळ दुर्घटना; प्रवासी सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप, चौकशीची मागणी

किनवट (प्रतिनिधी) : हैदराबाद येथील चिन्ना जियर स्वामी मंदिरात सत्संगासाठी जात असलेल्या किनवट शहरातील महिलांच्या खासगी आराम बसला गुरुवारी (१३ ऑगस्ट) तेलंगणातील आरमूरजवळ गोविंदपूर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर भीषण अपघात झाला. धावत्या बसचा टायर फुटल्याने झालेल्या या दुर्घटनेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक महिला जखमी झाल्या. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आयोजकांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

या अपघातात भाजप नेते अशोक नेम्मानीवार यांच्या पत्नी सौ. सुजाता अशोक नेम्मानीवार (५५) आणि पत्रकार किरण तिरमनवार यांच्या पत्नी सौ. माधवी किरण तिरमनवार (४८) यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, किनवट शहरातील वेलमापुरा, रामनगर, बेल्लोरी आणि मांडवा परिसरातील वेलमा समाजातील सुमारे ५० ते ६० महिला दोन खासगी ट्रॅव्हल्समधून हैदराबादकडे रवाना झाल्या होत्या. या प्रवासासाठी भाविकांकडून ठरावीक रक्कम घेण्यात आली होती. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप केला जात आहे.

निकृष्ट वाहनांमधून प्रवास?
प्रवासासाठी वापरण्यात आलेल्या ट्रॅव्हल्सच्या वाहनांची फिटनेस व देखभाल योग्य प्रकारे करण्यात आली होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. वाहनांची स्थिती समाधानकारक नसतानाही प्रवासाला परवानगी देण्यात आली का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने महिला प्रवास करीत असताना चालकांव्यतिरिक्त जबाबदार व्यक्तींची पुरेशी व्यवस्था होती का, याबाबतही नागरिकांनी सवाल उपस्थित केला आहे.

अपघातानंतर मदतीचा अभाव
गोविंदपूरजवळ टायर फुटल्यानंतर बसचा अपघात झाला. अपघातानंतर घाबरलेल्या महिलांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याऐवजी त्यांना महामार्गावरील धोकादायक डिव्हायडरवर बसवून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनास्थळी मदतीसाठी आयोजकांपैकी कोणी तत्काळ उपस्थित होते का, याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.

दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

या दुर्घटनेत दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. योग्य दर्जाची वाहने, वाहनांची फिटनेस तपासणी आणि प्रवाशांच्या सुरक्षेची आवश्यक काळजी घेतली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, असा संताप नागरिकांतून व्यक्त होत आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आयोजक तसेच संबंधित ट्रॅव्हल्स मालक व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी किनवटवासीयांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button