नांदेड जिल्ह्याला मंत्रिपदाची प्रतीक्षा; हेमंत पाटील यांच्या नावासाठी शिवसैनिक आग्रही!
जिल्ह्याच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा मुद्दा ऐरणीवर; मनोज तिरमनवार यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

नांदेड विशेष प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्याला राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळावे आणि माजी खासदार तथा शिवसेना नेते हेमंत पाटील यांना मंत्रिपदाची संधी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे नांदेड जिल्हा सचिव मनोज तिरमनवार यांनी केली आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही मागणी केली आहे.
राज्याच्या राजकारणात नांदेड जिल्ह्याला महत्त्वाचे स्थान असतानाही जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची खंत शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या नऊ जागांपैकी चार जागांवर शिवसेनेचे आमदार निवडून आल्याचा दावा तिरमनवार यांनी केला आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन मंत्रिमंडळात जिल्ह्याला स्थान द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांना प्राधान्याची अपेक्षा
हेमंत पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, बंजारा समाज आणि ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा केल्याचे तिरमनवार यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळताना येणाऱ्या अडचणी, सिबिलच्या अटी, बँकांच्या कर्जवाटपातील समस्या आणि कृषिपंपांच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न यांसारख्या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष वेधल्याचे सांगण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर शासनस्तरावर प्रभावीपणे आवाज उठविण्यासाठी जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असल्याचेही तिरमनवार यांनी म्हटले आहे.
माहूरगड, किनवटच्या विकासाचा मुद्दा
नांदेड जिल्ह्यातील माहूरगड हे धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे क्षेत्र आहे. या परिसराच्या विकासासोबतच किनवट तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागांमध्ये रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा बळकट करण्याची गरज आहे. या भागांतील प्रश्नांना शासनाच्या प्राधान्यक्रमावर आणण्यासाठी जिल्ह्याला मंत्रिपदाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष
नांदेड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन हेमंत पाटील यांच्या नावाचा मंत्रिपदासाठी विचार करावा, अशी मागणी मनोज तिरमनवार यांनी केली आहे. त्यांना संधी मिळाल्यास जिल्ह्यातील विकासकामे आणि स्थानिक प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आगामी मंत्रिमंडळ विस्तारात नांदेड जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळणार का आणि हेमंत पाटील यांच्या नावाचा विचार होणार का, याकडे आता जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.



