Uncategorized

अवैध रेतीसाठ्यावर वन- महसूल प्रशासनाचा धडक छापा!

वन विभागाच्या ड्रोन पाहणीत तस्करीचे जाळे उघड; जंगलात चार ट्रॅक्टर रेतीसाठा आढळला, महसूल व वनविभागाची संयुक्त कारवाई

किनवट : तालुक्यातील इस्लापूर परिसरातील भंडारवाडी-पिंपरी शिवारात सुरू असलेल्या अवैध रेती व्यवसायाविरोधात वन व महसूल विभागाने शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) धडक कारवाई केली. पिंपरी येथील पैनगंगा नदीकाठावरील सर्वे क्रमांक १४७ जवळ एका शेतात अंदाजे ५० ब्रास रेतीचा विनापरवाना साठा आढळून आला. या साठ्याचा पंचनामा करून तो जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली. तसेच भंडारवाडी जंगलात चार ट्रॅक्टर रेतीसाठा आढळल्याने रेती तस्करीचे मोठे जाळे सक्रिय असल्याचे समोर आले आहे.

भंडारवाडी-पिंपरी परिसरात अवैध रेती उपसा व साठवणूक सुरू असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सतीश वाळकीकर यांनी वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक उत्तम फड यांना दिली होती. या तक्रारीची दखल घेत उपवनसंरक्षक फड यांनी ड्रोनच्या माध्यमातून परिसराची पाहणी केली. यामध्ये एका शेतात मोठ्या प्रमाणात रेतीसाठा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी बोधडी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रकांत पोतुलवार यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले.

वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असता संबंधित रेतीसाठा खासगी शेतात असल्याचे आढळले. त्यामुळे पुढील कारवाईसाठी हा साठा महसूल प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आला. सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवणन यांच्या आदेशानुसार व तहसीलदार डॉ. शारदा चोंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने पिंपरी येथील पैनगंगा नदीकाठावरील सर्वे क्रमांक १४७ जवळील अंदाजे ५० ब्रास रेतीसाठ्याचा पंचनामा करून पुढील आदेशापर्यंत तो जप्त केला.

दरम्यान, बोधडी वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना भंडारवाडी जंगलात चार ट्रॅक्टर रेतीसाठा आढळून आला. वन विभागाने हा साठा जप्त करून पंचनामा केला आहे. जंगलातील अन्य ठिकाणीही रेती लपवून ठेवली आहे का, याचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रकांत पोतुलवार यांनी दिली.

या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी सचिन धुमाळे, मंडळ अधिकारी शितल ढाकूलकर, कोतवाल माहुरे, वनपाल बडूरे, निलपत्रेवार, देंडके तसेच वनरक्षक गड्डे, काळे, तलांडे, लांडगे व खोत यांनी सहभाग घेतला. अवैध रेती उत्खनन व साठवणूक करणाऱ्यांविरोधात प्रशासनाकडून यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत या मोहिमेतून मिळाले आहेत.

Related Articles

Back to top button