किनवटच्या जलसमृद्धीचा मार्ग मोकळा; पैनगंगा बंधारा पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर!
१०२ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंतिम टप्प्यात; ९० टक्के काम पूर्ण, १५ दिवसांत बंधाऱ्याचे काम पूर्ण होणार; १,५७० हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ.

किनवट : किनवट शहरासह परिसरातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी समोर आली आहे. पैनगंगा नदीवरील नवनिर्मित उच्च पातळी बंधाऱ्याचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम येत्या १५ दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. परतीचा पाऊस झाल्यास बंधाऱ्यात गेट बसवून पाणी अडविण्याची तयारी करण्यात येणार असल्याची माहिती गोदावरी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पंकज गावंडे यांनी दिली.
किनवट शहरालगत पैनगंगा नदीवर तब्बल १०२ कोटी रुपये खर्चून १३ गेटचा उच्च पातळी बंधारा उभारण्यात येत आहे. सध्या केवळ गर्डरवर स्लॅब टाकण्याचे काम शिल्लक असून, ते पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शासनाने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन धरणे व बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यासंदर्भातील काही जाचक अटी शिथिल केल्याने या बंधाऱ्यात पाणी साठविण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
या प्रकल्पात १२ मीटर रुंदीची आणि ७ मीटर उंचीची एकूण १३ गेट बसविण्यात येणार आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुमारे १०.५७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण होणार असून, १,५७० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे किनवट शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. तसेच किनवट व उमरखेड तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना आणि शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळी हंगामासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
विशेष म्हणजे, बंधाऱ्याच्या भूमिपूजनानंतर अवघ्या २४० दिवसांत रात्रंदिवस काम करून प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आणण्यात आले आहे. आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर गोदावरी पाटबंधारे विभागाच्या देखरेखीखाली कामाला गती देण्यात आली.
बंधारा किनवटच्या विकासाला नवी दिशा देणार : आमदार केराम
आमदार भीमराव केराम म्हणाले की, पैनगंगा उच्च पातळी बंधारा हा किनवट तालुक्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि बहुप्रतीक्षित प्रकल्प आहे. या बंधाऱ्यामुळे सिंचन, पिण्याचे पाणी आणि जलसंधारणाच्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, गुणवत्तापूर्ण काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. बंधारा पूर्ण झाल्यानंतर शेतकरी, नागरिक आणि परिसराच्या आर्थिक व सामाजिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अधिकाऱ्यांचे कामावर लक्ष
प्रकल्पाच्या कामाचा दर्जा आणि गती कायम राखण्यासाठी गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडून नियमित देखरेख केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकारी संचालक जयंत गवळी, अधीक्षक अभियंता सथाकर कचकलवार आणि कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता पंकज गावंडे व कनिष्ठ अभियंता शिवशंकर डाखोरे हे कामाच्या प्रगतीवर आणि गुणवत्तेवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, यंदा पैनगंगा नदी हिवाळ्याच्या सुरुवातीलाच कोरडी पडल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. अशा परिस्थितीत बंधाऱ्याचे काम पूर्ण होऊन पाणी अडविणे शक्य झाल्यास किनवटकरांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.



