Uncategorized

किनवटमध्ये कॅनरा बँकेतील खात्यातून १.९६ लाखांची रक्कम परस्पर हस्तांतरित

अवघ्या दोन दिवसांत दोन संशयास्पद व्यवहार; खातेदाराची सायबर क्राईमकडे धाव, बँक व्यवस्थापकांसह पोलिसांकडे तक्रार

किनवट, प्रतिनिधी : शहरातील कॅनरा बँकेच्या शाखेतील एका खातेदाराच्या बँक खात्यातून अवघ्या दोन दिवसांत १ लाख ९६ हजार ३ रुपयांची रक्कम परस्पर दुसऱ्या खात्यात हस्तांतरित झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आपण कोणताही व्यवहार केला नसताना खात्यातून मोठी रक्कम कमी झाल्याने खातेदाराने बँक व्यवस्थापन आणि पोलिसांकडे धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील इस्लामपुरा भागातील जबिरोद्दीन चव्हाण यांच्या कॅनरा बँकेतील खात्यातून २० ऑक्टोबर रोजी ९८ हजार १ रुपये, तर २१ ऑक्टोबर रोजी ९८ हजार २ रुपये असे दोन व्यवहार झाले. या दोन्ही व्यवहारांतून एकूण १ लाख ९६ हजार ३ रुपये खात्यातून कमी झाले. हे व्यवहार आपण केले नसल्याचे खातेदाराने स्पष्ट केले आहे.

या प्रकारानंतर चव्हाण यांनी सायबर क्राईमकडे तक्रार नोंदवली. तसेच २२ ऑक्टोबर रोजी कॅनरा बँकेच्या किनवट शाखेचे व्यवस्थापक आणि किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली. खात्यातून परस्पर वळती झालेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

बँक खात्यातून अशा प्रकारे मोठी रक्कम परस्पर हस्तांतरित झाल्याने ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित व्यवहारांचा उलगडा करण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Back to top button