ठिबक सिंचन काळाची गरज
कृषी अधिकारी विनोद कदम यांचे प्रतिपादन; आसोलीतील चरणसिंग राठोड यांच्या पाच एकर कापूस शेतीची शेतकऱ्यांकडून पाहणी

श्रीक्षेत्र माहूर : यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने माहूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कृषी अधिकारी विनोद कदम यांनी केले.
माहूर तालुक्यातील आसोली येथील प्रगतिशील शेतकरी तथा सरपंच चरणसिंग राठोड यांनी विहिरीतील उपलब्ध पाण्यावर ठिबक सिंचनाचा वापर करून पाच एकर क्षेत्रात कापसाचे पीक घेतले आहे. कमी पर्जन्यमान असतानाही ठिबक सिंचनामुळे कापसाचे पीक चांगले बहरले असून, यंदा एकरी १५ ते २० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी राठोड यांच्या शेताला भेट देऊन ठिबक सिंचनावर बहरलेल्या कापूस पिकाची पाहणी करीत आहेत.
कृषी विभागाकडून प्रगतिशील शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे. तालुका कृषी अधिकारी वर्षा चव्हाण, कृषी अधिकारी विनोद कदम, कृषी सहाय्यक अजय सावळे यांनी शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले आहे. कृषी अधिकारी कदम यांनी चरणसिंग राठोड यांच्या कापूस पिकाची वेळोवेळी पाहणी करून किडींचा प्रादुर्भाव व रोगराईपासून पिकाचे संरक्षण, पाते व फळांची वाढ तसेच आवश्यक पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.
माहूर तालुक्यात पर्जन्यमान कमी असतानाही अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा आधार घेतल्याने त्यांच्या पिकांची वाढ चांगली झाली आहे. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून उत्पादन वाढविण्यासाठी पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करावा, असे आवाहन कृषी अधिकारी विनोद कदम यांनी केले.



