Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन देणार

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नांदेड जिल्हा तलाठी संघाचा निर्णय

नांदेड (प्रतिनिधी) : राज्यात अपुऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकारी आपल्या सप्टेंबर २०२६च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार आहेत. महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने सामाजिक बांधिलकी आणि शासनाचा जबाबदार घटक म्हणून हा निर्णय घेतला आहे.

राज्यातील बहुतांश भागात अपुऱ्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आणि नागरिक संकटात सापडले आहेत. या परिस्थितीत शासनाच्या निर्देशानुसार ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबविण्यासाठी दिवसरात्र कार्यरत आहेत.

या आपत्तीला एकजुटीने सामोरे जाण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गाची शासन आणि जनतेसोबत कायम साथ राहील, अशी ग्वाही तलाठी संघाने दिली आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष एन. जी. कानगुले आणि जिल्हासचिव गौतम एस. पांढरे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

Related Articles

Back to top button