नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल; १८ ऑगस्टला मतदान २३ संचालक पदांसाठी निवडणूक; तीन दिवसांत २९६ उमेदवारी अर्जांची विक्री

नांदेड, प्रतिनिधी : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, १८ ऑगस्ट २०२६ रोजी २३ जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील सहकार व राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. गेल्या तीन दिवसांत तब्बल २९६ उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याने यंदा अर्जांचा पाऊस पडण्याची चिन्हे आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) शहाजराज हिरे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम, २०१४ अन्वये अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार १० जुलै रोजी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया होईल. ८ जुलैपासून अर्जांची छाननी, १६ जुलै रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मतदान होईल. १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
एकूण २३ जागांमध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठा व विकास सेवा सहकारी संस्थांसाठी १६ जागा, नागरी सहकारी बँका, पतसंस्था व ग्रामीण बिगरशेती पतसंस्थांसाठी १ जागा, तर इतर पात्र संस्था व व्यक्ती सभासदांसाठी ५ राखीव जागांचा समावेश आहे. या राखीव जागांमध्ये अनुसूचित जाती-जमाती, महिला, इतर मागासवर्गीय तसेच भटक्या-विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
यंदाची निवडणूक सत्ताधारी महायुती विरुद्ध विरोधक महाआघाडी अशी रंगणार की दोन्ही बाजूंमध्येच फाटाफूट होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आमदार आणि प्रस्थापित नेत्यांची दुसरी पिढी जिल्हा बँकेच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असून अनेक गावपातळीवरील नेते तसेच माजी संचालकही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



