कर्जमाफीच्या जाचक अटी रद्द करा; किनवटमध्ये किसान सभेचे आक्रमक आंदोलन
राजकीय हस्तक्षेपामुळे कर्जमाफी समितीची बैठक रद्द

किनवट | प्रतिनिधी : शेतकरी कर्जमाफीवरील जाचक अटी-शर्ती तात्काळ रद्द कराव्यात आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा, किनवटच्या वतीने शुक्रवारी (10 जुलै) तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारच्या भूमिकेचा निषेध करत तहसीलदार चोंडेकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राज्यभर शेतकरी कर्जमाफीच्या अटी-शर्तींविरोधात आंदोलन सुरू असताना या विषयावर चर्चा करण्यासाठी ‘परदेशी समिती’सोबत आयोजित करण्यात आलेली महत्त्वाची बैठक राजकीय हस्तक्षेपामुळे ऐनवेळी रद्द करण्यात आल्याचा आरोप किसान सभेने केला. ही घटना शेतकरीविरोधी असून सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ करू नये, असा इशारा आंदोलकांनी दिला.
यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अर्जुन आडे यांनी राज्यातील सर्व २८८ आमदारांना आवाहन करत, विधानसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमकपणे आवाज उठवावा, अशी मागणी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मौन बाळगणाऱ्या लोकप्रतिनिधींना भविष्यात शेतकरी धडा शिकवतील, असा इशाराही त्यांनी दिला.
आंदोलनादरम्यान शेतकरी कर्जमाफीवरील सर्व जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात, परदेशी समितीसोबतची बैठक पुन्हा आयोजित करावी तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सातबारा कोरा करणारी सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनात जनार्धन काळे, यशवंत राठोड, मनोज सलावार, रंगराव चव्हाण, विजय जाधव, मोहन जाधव, आडेलू बोनगिर, शेषेराव ढोले, सिताराम आडे, सुनील राठोड, सुनील केंद्रे, नंदू मोडूकवार, शेख फरीद बाबा, अंबर चव्हाण, झुमकीलाल आडे यांच्यासह किसान सभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा किसान सभेच्या वतीने देण्यात आला.



