आदिवासी महिलेच्या उपोषणाची सहाव्या दिवशी सांगता
उच्चस्तरीय चौकशीचे लेखी आश्वासन; शिवसेनेचे नेते मारोती सुंकलवाड यांच्या मध्यस्थीला यश

किनवट, प्रतिनिधी : आशा स्वयंसेविका म्हणून पुनश्च नियुक्ती आदेश निर्गमित करून सेवेत रुजू करून घ्यावे, या मागणीसाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आदिवासी महिलेच्या बेमुदत आमरण उपोषणाची सहाव्या दिवशी सांगता झाली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मारोती सुंकलवाड यांच्या मध्यस्थीनंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के. पी. गायकवाड यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून पुढील कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर रेणुका पाचपुते यांनी उपोषण मागे घेतले.
किनवट तालुक्यातील जलधरा येथील रहिवासी रेणुका श्रीराम पाचपुते यांची ग्रामसभेच्या शिफारसीनुसार सन २०२४ मध्ये तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत आशा स्वयंसेविका म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, तीन अपत्ये असल्याचे कारण देत त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करत नियुक्ती बहाल करून पुनश्च सेवेत रुजू करून घ्यावे, या मागणीसाठी पाचपुते यांनी १३ ऑगस्टपासून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
पाच दिवस उलटूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने उपोषण सुरूच होते. दरम्यान, १८ ऑगस्ट रोजी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मारोती सुंकलवाड, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जाधव आणि अॅड. चतुरंग कांबळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन रेणुका पाचपुते यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के. पी. गायकवाड यांच्याशी चर्चा केली.
चर्चेनंतर संबंधित प्रकरणाची विभागीय स्तरावर चौकशी करून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. लेखी पत्र मिळाल्यानंतर मारोती सुंकलवाड यांच्या हस्ते पेय प्राशन करून रेणुका पाचपुते यांनी सहाव्या दिवशी उपोषण सोडले.
यावेळी पत्रकार बाबू नेमानीवार, मधुकर अंनेलवार, संतोष सिसले, जगदीश सामनपेल्लीवार, शिवराम जाधव, युवानेते संदीप निखाते, राजूभाऊ कलकुंटलावार यांच्यासह स्थानिक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.



