Uncategorized

गोकुंद्यात स्वतंत्र ग्रामीण पोलीस ठाण्याची मागणी

ठाकरे चौकातील गँगवारनंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर; अवैध धंद्यांवर कारवाईसह पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी

किनवट (प्रतिनिधी) : गोकुंदा परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून, येथे स्वतंत्र ग्रामीण पोलीस ठाणे सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ठाकरे चौकातील गँगवारच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी (दि. 2 नोव्हेंबर) शिष्टमंडळाने नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

गोकुंदा येथील स्व. बाळासाहेब ठाकरे चौक हा परिसरातील प्रमुख बाजारपेठेचा आणि वर्दळीचा भाग आहे. या परिसरात शाळा, महाविद्यालये, खासगी शिक्षण संस्था, पोलीस प्रशिक्षण केंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि आदिवासी प्रकल्प कार्यालय असल्याने विद्यार्थी, महिला, रुग्ण व नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, स्वतंत्र ग्रामीण पोलीस ठाणे नसल्याने परिसरातील नागरिकांना सुरक्षिततेबाबत चिंता सतावत आहे.

दरम्यान, 22 व 23 ऑक्टोबर 2026 रोजी ठाकरे चौकात दोन गटांत धारदार शस्त्रांनी झालेल्या तुंबळ हाणामारीत अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या गँगवारमुळे गोकुंदा परिसरासह किनवतमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, व्यापारी व व्यावसायिकांमध्येही असुरक्षिततेची भावना वाढली आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गोकुंदा येथे स्वतंत्र ग्रामीण पोलीस ठाणे तातडीने मंजूर करून कार्यान्वित करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

अवैध धंद्यांवर कारवाई करून पोलीस यंत्रणा सक्षम करण्याची मागणी

परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी किनवट पोलीस ठाण्यात सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, तसेच रिक्त पदे तातडीने भरून पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अवैध मटका, जुगार, गुटखा विक्री, अवैध दारू वाहतूक व विक्री तसेच गांजासारख्या अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांविरोधात विशेष मोहीम राबवावी. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून ठाकरे चौकातील हाणामारी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.

या शिष्टमंडळात माजी नगराध्यक्ष इसा खान, व्यंकटराव नेम्मानीवार, व्यंकटअण्णा भंडारवार, मारुती सुंकलवाड, संदीप निखाते, आशिष देशपांडे यांच्यासह अन्य नागरिकांचा सहभाग होता.

Related Articles

Back to top button