Uncategorized

इस्लापूरच्या चौकात काळाचा घाला; 22 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू!

बोलेरो पिकअपची दुचाकीला जोरदार धडक; आई-वडील जखमी, अपघातप्रवण चौकात गतिरोधक बसविण्याची मागणी

किनवट (प्रतिनिधी) : इस्लापूर येथील वननाक्यावरील मुख्य चौकात भरधाव बोलेरो पिकअपने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत 22 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले. सोमवारी (दि. 2 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जलधारा परिसरातील सावरगाव येथील ओमकार नंदू भंडारे (वय 22) हा युवक सकाळी नांदिग्राम एक्स्प्रेसने येणाऱ्या आपल्या आई-वडिलांना घेण्यासाठी दुचाकीने रेल्वेस्थानकावर गेला होता. आई-वडिलांना सोबत घेऊन तो सावरगावकडे परतत असताना इस्लापूर येथील वननाक्यावरील मुख्य चौकात बोलेरो पिकअप (क्र. एमएच 26-1838) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ओमकार गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. तर त्याचे वडील नंदू भंडारे (वय 60) आणि आई जखमी झाले.

अपघातानंतर तिघांनाही रुग्णवाहिकेद्वारे इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ओमकारला मृत घोषित केले. जखमी वडिलांवर उपचार करण्यात आले.

दरम्यान, इस्लापूरच्या वननाक्यावरील मुख्य चौकात यापूर्वीही अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे हा चौक अपघातांचा केंद्रबिंदू बनला आहे. वाहनांचा वाढता वेग आणि चौकातील सुरक्षिततेचा अभाव लक्षात घेता प्रशासनाने या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Back to top button