उनकेश्वरमध्ये इनोव्हातून दोन गायींची चोरी!
बेहोशीचे इंजेक्शन देऊन चोरट्यांनी जनावरे पळविली; ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्हीत घटना कैद

मांडवी (प्रतिनिधी) : किनवट तालुक्यातील श्रीक्षेत्र उनकेश्वर येथे पहाटेच्या सुमारास काळ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून आलेल्या चोरट्यांनी दोन गायी चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. 28 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 ते 3.15 वाजेदरम्यान घडलेली ही घटना ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उनकेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील मोकळ्या जागेत काही जनावरे बसली होती. यावेळी उमरी बाजारच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून काळ्या रंगाची इनोव्हा कार आली. जनावरे दिसताच चोरट्यांनी सरपंच पुंडलिक गेडाम यांच्या घराजवळ कार थांबविली. त्यातून काळे कपडे घातलेला एक इसम खाली उतरला आणि त्याने प्रथम एका काळ्या गायीला, त्यानंतर पांढऱ्या गायीला बेहोशीचे इंजेक्शन दिले.
यानंतर कार घटनास्थळावरून निघून गेली. मात्र, अवघ्या 15 मिनिटांनी ती पुन्हा त्याच ठिकाणी आली. चोरट्यांनी अशोक कन्नलवार यांची बेशुद्ध पडलेली पांढरी गाय कारमध्ये टाकली. तर संतोष पडवाळ यांची गाय पूर्णपणे बेशुद्ध न झाल्याने तिला दोरीने बांधून गावाबाहेर नेले आणि कारमध्ये टाकून चोरटे पसार झाले.
ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर चोरीचा संपूर्ण प्रकार समोर आला. याप्रकरणी संतोष जगन्नाथ पडवाळ यांच्या फिर्यादीवरून सुमारे 40 हजार रुपये किमतीच्या दोन गायींच्या चोरीप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं. 0121/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक मुरारी गायकवाड, जमादार अस्वले व श्याम माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अस्वले पुढील तपास करीत आहेत.
चार वर्षांपासून जनावर चोरट्यांचा धुमाकूळ
मांडवी व सिंदखेड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तेलंगणा सीमेलगतच्या गावांमध्ये जनावर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पहाटे 2 ते 4 वाजेदरम्यान चारचाकी वाहनांतून येणारे चोरटे जनावरे पळवून नेत असल्याच्या तक्रारी आहेत. आठवडाभरापूर्वी उमरी बाजार येथेही जनावरांची चोरी झाली होती. त्यामुळे जनावर चोरणाऱ्या टोळीचा शोध घेऊन चोरीच्या घटनांना आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.



