Uncategorized

पोलिसांची रात्रीची गस्त वाढली; चार वाहने ताब्यात!

ठाकरे चौकात मुलींना त्रास देणाऱ्यांवर पोलिसांची नजर; विनाकारण फिरणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा

किनवट (प्रतिनिधी) : गोकुंदा परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतंत्र ग्रामीण पोलीस ठाण्याची मागणी केली असतानाच, पोलीस प्रशासनानेही सुरक्षेच्या दृष्टीने हालचाली वाढविल्या आहेत. पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या नेतृत्वाखाली गोकुंदा बीटसह परिसरात रात्रीची गस्त वाढविण्यात आली असून, ठाकरे चौकात मुलींना त्रास देणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

या मोहिमेदरम्यान संबंधित तरुणांच्या वाहनांची तपासणी करण्यात आली. चार वाहनचालकांकडे वाहनांची अधिकृत कागदपत्रे मागितली असता ती सादर करता न आल्याने चारही वाहने मोटार वाहन कायद्याच्या कलम 207 अन्वये ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवरही पोलिसांची नजर असून, अशा हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित गस्त आणि विशेष पथकांमार्फत कारवाई केली जात आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्यासह पोलीस पथक स्वतः रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर उतरून बंदोबस्त करीत आहे. तसेच अतिरिक्त पथके पाठवूनही कारवाई करण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन आणि अपर पोलीस अधीक्षिका अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन तत्पर असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे. छेडछाड, अवैध धंदे आणि संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button