Uncategorized

धम्म चळवळ गतिमान करण्यात महिलांचे योगदान लक्षणीय : इंजि. डॉ. एम. एम. भरणे

वर्षावास समारोप कार्यक्रमात पौर्णिमा महिला मंडळाच्या कार्याचे कौतुक; तीन महिने परभणी धम्ममय

परभणी (प्रतिनिधी) : धम्म चळवळीच्या प्रसार आणि प्रचारामध्ये महिलांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत असून, वर्षावास कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी धम्म चळवळ गतिमान करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे मागील तीन महिने संपूर्ण परभणी शहर धम्ममय झाले, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष इंजि. डॉ. एम. एम. भरणे यांनी केले.

शंकरनगर येथे पौर्णिमा महिला मंडळाच्या वतीने आयोजित वर्षावास समारोप कार्यक्रमात ते धम्मप्रवचन करताना बोलत होते. वर्षावासानिमित्त शहरातील विविध नगरांमध्ये आयोजित प्रवचनमालिकेत सहभागी होताना धम्म चळवळीतील महिलांचे योगदान जवळून अनुभवता आले, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. पूज्य भंते मुदितानंद यांनी उपस्थितांना पंचशील दिले. त्यानंतर शंकरनगरवासीय आणि पौर्णिमा महिला मंडळाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.

विशेष म्हणजे, पूज्य भंते मुदितानंद यांनी वर्षावासाच्या तीन महिन्यांच्या कालावधीत ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे नियमित वाचन केले. त्यांच्या धम्मदेशनातून उपस्थितांना मार्गदर्शन लाभले.

यावेळी धम्मपीठावर नगरसेवक मिलिंद घागरमाळे, रवी भालेराव, डॉ. अनिल कांबळे, मनपाचे समाजकल्याण सभापती राजेश रणखांब, मंगला मुदगलकर, राज ब्रिगेडचे सुधीर कांबळे, सचिन पाचपुंजे, घनसावंत, धम्मदीप रोडे आणि दीपक वारकरी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेषराव जल्लारे यांनी केले, तर भरणे यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी पौर्णिमा महिला मंडळाच्या बहुसंख्य महिला तसेच उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button