चिंतामणी भारती, बाळू महाराजांना दत्तशिखरावर प्रवेशबंदी
अन्नत्याग आंदोलन सातव्या दिवशी स्थगित; ५ ऑक्टोबरला अंतिम निर्णय

श्रीक्षेत्र माहूर : श्री दत्तशिखर संस्थानच्या व्यवस्थापनासंदर्भातील विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करणारे प.पू. चिंतामणी भारती महाराज यांनी सातव्या दिवशी आंदोलन स्थगित केले. पंचदशनाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष प.पू.प.म. मोहन भारती महाराज यांनी शुक्रवारी (१९ सप्टेंबर) श्री दत्तशिखर संस्थानला भेट देत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर चिंतामणी भारती महाराज व बाळू महाराज यांना ५ ऑक्टोबरपर्यंत श्री दत्तशिखर संस्थान व अनुसयामाता मंदिर परिसरात प्रवेश न करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
चिंतामणी भारती महाराज यांनी संस्थानच्या व्यवस्थापनाबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे काही बाबींवर लेखी आक्षेप नोंदविले होते. त्याचप्रमाणे संस्थानच्या व्यवस्थापन समितीकडूनही चिंतामणी भारती महाराज यांच्याबाबत काही तक्रारी करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर संस्थानच्या व्यवस्थापनाकडून ते राहत असलेल्या खोलीला कुलूप लावण्यात आले होते. त्याच्या निषेधार्थ चिंतामणी भारती महाराज यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.
या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी मोहन भारती महाराज यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. परस्पर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महापुरुषांची समिती गठित करण्यात येणार असून, ही समिती दोन्ही बाजूंचे म्हणणे व उपलब्ध पुरावे तपासून ३ ऑक्टोबर रोजी अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मोहन भारती महाराज यांनी पत्रकारांना सांगितले.
अंतिम निर्णय होईपर्यंत चिंतामणी भारती महाराज व बाळू महाराज यांना श्री दत्तशिखर संस्थान तसेच अनुसयामाता मंदिरावर पाऊल ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हा निर्णय आपल्याला मान्य असल्याचे चिंतामणी भारती महाराज यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी सातव्या दिवशी सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले.


