Uncategorized

आदिवासी सुशिक्षित बेरोजगारांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षणाची संधी

किनवट येथील प्रशिक्षण केंद्रात 1 डिसेंबरपासून 116 वे प्रशिक्षण सत्र • 27 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 03 : आदिवासी (अनुसूचित जमाती) प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र, किनवट येथे 1 डिसेंबर 2026 पासून 116 वे प्रशिक्षण सत्र सुरू करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी पात्र इच्छुक आदिवासी उमेदवारांकडून 27 नोव्हेंबर 2026 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
या प्रशिक्षणासाठी उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक असून, किमान शालांत परीक्षा उत्तीर्ण असावे. उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवारांची कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयात नावनोंदणी असणे आवश्यक आहे. नांदेड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार केला जाणार आहे. उमेदवारांचे वय 27 नोव्हेंबर 2026 रोजी किमान 18 व कमाल 35 वर्षे असावे. यापूर्वी अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतलेल्या किंवा प्रशिक्षण सत्र अर्धवट सोडलेल्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही.
प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिने पंधरा दिवस असून, प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल. हे विद्यावेतन थेट प्रशिक्षणार्थींच्या बँक खात्यात जमा केले जाणार असल्याने बँक खाते चालू असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणादरम्यान विविध शासकीय पदांच्या भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाणार आहे. तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध विभागांच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती व मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींना किनवट येथे राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल.
पात्र इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्रे व जातीच्या प्रमाणपत्राच्या सत्यप्रतींसह आपले अर्ज 27 नोव्हेंबर 2026 पर्यंत आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाजूस, गोकुंदा, ता. किनवट, जि. नांदेड, पिन कोड 431811 या कार्यालयात पोहोचतील अशा बेताने पाठवावेत. अधिक माहितीसाठी 9881524643, 7219709633, 9518997868 किंवा 02469-221801 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सु. गो. चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
********

Related Articles

Back to top button