बुद्धाची शांती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतीच व्यवस्था परिवर्तन घडवू शकते!
वर्षावासाच्या समारोपप्रसंगी इंजि. डॉ. एम. एम. भरणे यांचे प्रतिपादन; धम्मप्रचारात महिला मंडळांचे योगदान कौतुकास्पद

पूर्णा | प्रतिनिधी : बुद्धाची शांती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांती यांमधूनच समाजात व्यवस्था परिवर्तन घडविण्याची ताकद आहे. बुद्धाच्या आर्य अष्टांगिक मार्गाने मानवाला सुख आणि समाधानाचा मार्ग मिळतो, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांतून विषमतावादी व्यवस्थेचे परिवर्तन शक्य आहे. ही ताकद केवळ जयभीमच्या विचारांत आहे. जयभीम हा आपला श्वास आहे, तोच आपला घास आहे. त्यामुळे प्रत्येकाने धम्म चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे परभणी जिल्हाध्यक्ष इंजि. डॉ. एम. एम. भरणे यांनी केले.
विशाखा व वैशाली महिला मंडळाच्या वतीने वर्षावास कार्यक्रमाचा समारोप 03 नोव्हेंबर 2026 रोजी भीमनगर येथील भय्यासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मिनबाई एंगडे होत्या. धम्मपीठावर पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भदंत पय्यावंश, बाल भंते आणि इंजि. डॉ. एम. एम. भरणे उपस्थित होते.
यावेळी धम्मदेशना देताना पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी, ”बेईमान झालात तरी चालेल; मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी कधीही बेईमानी करू नका. त्यांच्या त्यागामुळेच आपल्याला माणूसपण मिळाले आहे, हे कधीही विसरू नका,” असे भावनिक आवाहन केले. भदंत पय्यावंश यांनीही उपस्थितांना धम्मदेशना दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पूज्य भदंतांनी उपस्थितांना पंचशील दिले. प्रमुख पाहुणे व भंते यांचे स्वागत वैशाली आणि विशाखा महिला मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
वर्षावासाच्या तीन महिन्यांच्या कालावधीत आदरणीय मंजुषाताई मुकुंद पाटील यांनी सातत्याने धम्मग्रंथांचे वाचन केले. त्यांच्या या योगदानाबद्दल दोन्ही महिला मंडळांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. वर्षावासाच्या माध्यमातून धम्मप्रचार आणि विचारप्रसाराचे कार्य महिला मंडळांनी जोमाने पुढे नेल्याचे यावेळी दिसून आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्ध अमृत कर्माचे यांनी केले, तर आभारप्रदर्शन बौद्ध त्रिंबक कांबळे यांनी केले. यावेळी सुनील पवार, शिवाजी वाव्हळे, पी. एल. वानखेडे, मुकुंद पाटील, जिनकीराम भवरे, मुगाजी खंदारे, बी. बी. वाघमारे, डॉ. तुपसुंदर, शामराव जोगदंड, श्रीकांत हिवाळे, अतुल गवळी, बौद्ध यशवंत लांबसोंगे, विलास भवरे यांच्यासह महिला मंडळांच्या बहुसंख्य उपासिका उपस्थित होत्या. शेवटी सरणतय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



