‘संथागार’ वृद्धाश्रमाचा सहावा वर्धापन दिन उत्साहात
‘वृद्धाश्रम नव्हे, हे आमचे घरच’; सचिव करुणा आळणे यांची भावस्पर्शी भावना

किनवट : निराधार आणि गरजू ज्येष्ठ नागरिकांना मायेचा आधार देत त्यांना सन्मानाने जगण्याची उमेद देणाऱ्या किनवट येथील ‘संथागार वृद्धाश्रमा’चा सहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ३ नोव्हेंबर २०२० रोजी सुरू झालेल्या या वृद्धाश्रमाने सहा वर्षांचा सेवाभावी प्रवास पूर्ण केला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नांदेड जिल्हाध्यक्ष ज्योतिबा दादा खराटे, बेबीताई प्रदीप नाईक, नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत कोरडे, स्वीकृत नगरसेवक तथा नगरपालिकेचे उपाध्यक्ष हसनलाला, सामाजिक कार्यकर्त्या शीलाताई इंदवर बनसोड आणि छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस उपनिरीक्षक उषाताई घाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेचे संचालक अरुण लक्ष्मणराव आळणे यांनी प्रास्ताविकातून वृद्धाश्रमाच्या स्थापनेमागील भूमिका, सहा वर्षांतील वाटचाल, अडचणी आणि भविष्यातील नियोजनाची माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांना केवळ निवारा नव्हे, तर सुरक्षितता, सन्मान आणि कुटुंबातील सदस्याप्रमाणे आपलेपणा मिळावा, हा संस्थेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृद्धाश्रमाच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मात्र, कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते संस्थेच्या सचिव करुणा आळणे यांचे मनोगत. ‘मी या वृद्धाश्रमाला घर मानते. याला केवळ वृद्धाश्रम किंवा आश्रम समजले असते, तर कदाचित इतक्या आपुलकीने काम करू शकले नसते. स्वतःच्या घरात काम करताना जशी भावना असते, तशीच भावना येथे काम करताना असते,’ असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. त्यांच्या या मनोगताने उपस्थितांची मने जिंकली.
या वृद्धाश्रमाच्या स्थापनेमागे संचालक अरुण आळणे यांची कन्या आकांक्षा आळणे हिची प्रेरणा आहे. तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३ नोव्हेंबर २०२० रोजी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. आज अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी संथागार हे केवळ निवासस्थान न राहता मायेचे आणि आपलेपणाचे घर बनले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल बनसोड यांनी केले. आम्रपाली वाठोरे यांच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर आकांक्षा आळणे हिने आभार मानले.
माणुसकी, आपुलकी आणि ज्येष्ठांचा सन्मान या मूल्यांची जपणूक करत संथागार वृद्धाश्रमाने पूर्ण केलेली सहा वर्षांची वाटचाल समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.



