चाकूरकर यांच्या पार्थिवावर वरवंटी येथे अंत्यसंस्कार

लातूर : नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री,पंजाबचे राज्यपाल आणि लोकसभा अध्यक्ष अशी सहा दशकांची राजकीय कारकीर्द गाजविणाऱ्या शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या पार्थिवावर शनिवारी लातूरजवळील वरवंटी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खंड्रे, डॉ. भागवत कराड, रजनीताई पाटील, डॉ. अजित गोपछडे. डॉ. शिवाजी काळगे हे खासदार, माजी मंत्री आ. अमित देशमुख, दिलीपराव देशमुख आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ नेते शिवराज पाटील – चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राच्या शालीनता, सुसंस्कृततेचा लौकिक जपणारे आणि तो राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पोहचविणारे नेतृत्व म्हणून ज्येष्ठ नेते शिवराज पाटील- चाकूरकर सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री शिवराज पाटील – चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनामुळे राजकारण- समाजकारणातील उत्तुंग अशा मार्गदर्शक नेतृत्वाला मुकलो आहोत, अशी शोकभावना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.



