Uncategorized

महिलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपींची दिवाळी जेलमध्ये!

अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या तरुणासह आदिवासी महिलेच्या तक्रारीतील आरोपीला अटक; किनवट पोलिसांची कठोर कारवाई

किनवट : महिलांची छेडछाड, विनयभंग तसेच महिलांविरुद्ध होणाऱ्या अन्यायकारक कृत्यांना आळा घालण्यासाठी किनवट पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांतील आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे महिलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपींची दिवाळी आता तुरुंगात जाणार आहे.

पोलीस स्टेशन किनवट येथे गुन्हा क्रमांक 324/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 74, 351(2) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 8, 12 आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीची रस्त्यात छेडछाड केल्याप्रकरणी गोकूळ मारोती राऊत (रा. दत्तमांजरी, ता. माहूर, जि. नांदेड) याला पोलिसांनी अटक केली आहे.

तर दुसऱ्या घटनेत एका आदिवासी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन किनवट येथे गुन्हा क्रमांक 308/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 352, 351(2) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 मधील कलम 3(1)(r), 3(1)(s) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी अमोल विठ्ठलराव नेम्मानिवार (रा. मांडवा) हा पोलिसांना चकवा देत होता. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून शेतातून पकडले आणि अटक केली.

नियमबाह्य कामासाठी पोलिसांना फोन करू नका!

महिलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. तसेच नागरिकांनी पोलिसांना कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन काम करण्यासाठी विनंती किंवा दबाव आणू नये. आरोपींना कारवाईतून सूट मिळवून देण्यासाठी फोन करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमबाह्य कामासाठी शिफारस किंवा दबाव आणणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला.

शहरातील हुल्लडबाजी, मुलींची छेडछाड आणि महिलांना त्रास देण्याचे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या वर्तनाकडे लक्ष द्यावे. तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडाची रक्कम वाढविण्यात आली असून कारवाई ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे.

पोलीस प्रशासनाविरुद्ध काही तक्रार असल्यास नागरिकांनी रीतसर तक्रार दाखल करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button