Uncategorized

किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनियमिततेचा आरोप; चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

किनवट  किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीतील आर्थिक, प्रशासकीय व कायदेशीर अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती गजानन मुंढे यांनी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बाजार समितीतील कारभाराबाबत निवेदनात सहा प्रमुख मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. यामध्ये संबंधित कालावधीतील लेखापरीक्षण अहवालातील त्रुटी, बाजार समितीच्या मीटिंग हॉल दुरुस्तीतील कथित गैरव्यवहार आणि बिंदू नामावलीनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात न आल्याचा आरोप करण्यात आला आहे.तसेच बाजार समितीचे सचिव सेवानिवृत्त झाल्यानंतर मुदतवाढ देताना संचालक मंडळाचे मंजुरीपत्र न घेता केवळ सहायक निबंधकांच्या मंजुरीवर कामकाज सुरू ठेवण्यात आल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे. संबंधित कालावधीत नियमबाह्य भरती प्रक्रिया राबवून पूर्ण पगार दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
॥ जमीन विक्री आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांवरही आक्षेप ॥
बाजार समितीची जमीन विक्री करताना संचालक मंडळ व सचिवांनी जवळच्या व्यक्तींची नावे बोली प्रक्रियेत टाकून जमीन विक्री केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या व्यवहारामुळे बाजार समितीचे तसेच शासनाचे आर्थिक नुकसान झाल्याचेही म्हटले आहे.याशिवाय, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांची परवानगी न घेता त्यांना हंगामी कर्मचारी म्हणून कामावर ठेवल्याचा, तसेच काही कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत अनियमितता झाल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे.या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी व विशेष लेखापरीक्षण करून संबंधित दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी  गजानन मुंढे यांनी केली

Related Articles

Back to top button