Uncategorized

पालकमंत्री अतुल सावे यांचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक कोटींचा मदतनिधी

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द

नांदेड, दि. 04 : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आपल्या चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या रकमेचा धनादेश त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्री सावे यांचे आभार मानले.

मंत्री अतुल सावे यांचे धाकटे चिरंजीव तथा उद्योजक अनुराग सावे यांचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक अजित मुळे यांची कन्या ईशा यांच्याशी दि. 25 नोव्हेंबर रोजी नियोजित आहे. मात्र, सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असून विशेषतः मराठवाड्यातील शेतकरी शेतीच्या नुकसानीमुळे कठीण परिस्थितीचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळा साजरा करणे उचित नसल्याची भूमिका दोन्ही परिवारांनी घेतली. विवाह सोहळ्यासाठी नियोजित असलेला खर्च टाळून ही रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा संवेदनशील निर्णय त्यांनी घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहे. या प्रयत्नांना हातभार लावण्याच्या भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ही एक कोटी रुपयांची देणगी समर्पित करण्यात आली आहे. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button