Uncategorized
किनवतमध्ये मटका जुगारावर पोलिसांचा धडाका; दोन दिवसांत 4 जणांविरुद्ध गुन्हे दाखल
श्रीदेवी ओपन-क्लोज मटका जुगारावर दोन ठिकाणी कारवाई; 3,470 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

किनवट : शहरात सुरू असलेल्या मटका जुगाराविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा आणि किनवट पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. 2 ठिकाणी करण्यात आलेल्या स्वतंत्र कारवाईत श्रीदेवी ओपन-क्लोज मटका जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्यांविरुद्ध एकूण 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, 3,470 रुपये रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दि. 04 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गौडराजे मैदानासमोरील सार्वजनिक ठिकाणी कारवाई केली. यावेळी कपिल नामदेवराव ठमके (वय 39, रा. सिद्धार्थनगर, किनवट) आणि राहुल बबन सरपे (रा. सिद्धार्थनगर, किनवट) यांच्याविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 328/2026, कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरून 1,670 रुपये रोख, मटक्याच्या चिठ्ठ्या आणि गुलाबी रंगाचा पेन जप्त करण्यात आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी रितेश राजेंद्र कुलथे यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सिरमनवार करीत आहेत.
तर दि. 03 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 2.10 वाजण्याच्या सुमारास किनवट शहरातील मुख्य बाजारपेठेत एका टिनपत्राच्या शेडजवळ किनवट पोलिसांनी दुसरी कारवाई केली. यावेळी श्रीदेवी मटका जुगार खेळणाऱ्या सचिन गणेश चव्हाण (वय 25, रा. सेवालालनगर, टाकळी) आणि राजेश्वर नारायण गोणेवार (वय 69, रा. शाहूनगर, गोकुंदा) यांच्याकडून अनुक्रमे 1,100 रुपये व 700 रुपये रोख तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल बाबू जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 326/2026, कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत राहुल सरपे याचेही नाव नमूद आहे. पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास एपीआय चव्हाण करीत आहेत.
शहरातील सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या मटका जुगाराविरुद्ध पोलिसांनी सलग दोन दिवस केलेल्या या कारवाईमुळे जुगार व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.



