दिवाळीत अखंडित वीजपुरवठ्याचे आमदार भीमराव केराम यांचे निर्देश!
तांत्रिक बिघाड तातडीने दुरुस्त करा; आवश्यकतेनुसार रोहित्र उपलब्ध ठेवण्याच्या महावितरणला सूचना

किनवट : दिवाळी सणाच्या काळात किनवट तालुक्यातील नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी आमदार भीमराव केराम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वीजपुरवठ्याचा आढावा घेतला. गोकुंदा येथील शासकीय विश्रामगृहात ही बैठक पार पडली.
यावेळी दिवाळीदरम्यान तालुक्यात कुठेही वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश आमदार केराम यांनी दिले. वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्यास तातडीने दुरुस्ती करावी, तसेच गरज भासल्यास रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) तत्काळ उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या.
बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता रामगीरवार (भोकर), उपअभियंता केंद्रे (किनवट), नागभिडे यांच्यासह माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, गटनेते श्रीनिवास नेमानीवार, यशवंत जाधव, अभय नगराळे, बालाजी आलेवार, स्वागत आयनेनीवार, नगरसेवक संतोष मरस्कोल्हे, गजानन कोल्हे, प्रवीण गावडे आदी उपस्थित होते.
सणासुदीच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने सतर्क राहून वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, असे आवाहन आमदार केराम यांनी केले.



