आदिवासी विकासातील घोटाळा 20 कोटींच्या उंबरठ्यावर! भगवान डवरे, संतोष मारपवार यांना 7 नोव्हेंबरपर्यंत पीसीआर

किनवट : किनवटच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील कथित आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती वाढतच असून, आणखी 2 कोटी 13 लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार उघडकीस आले आहेत. यामुळे यापूर्वीच्या 16 कोटी 37 लाख 66 हजार912 रुपयांच्या कथित अपहारासह घोटाळ्याची रक्कम सुमारे 19 कोटी 60 लाख रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे हा घोटाळा आता 20 कोटींच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.
या प्रकरणात नांदेड आर्थिक गुन्हे शाखेने कथित मुख्य सूत्रधार वरिष्ठ लिपिक तथा तत्कालीन रोखपाल भगवान उद्धवराव डवरे आणि कंत्राटी संगणक चालक संतोष रमेश मारपवार यांच्यासह 8 जणांना अटक केली आहे. नव्याने उघड झालेल्या व्यवहारांच्या तपासासाठी डवरे आणि मारपवार यांना किनवट न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या गैरव्यवहारात आणखी अधिकारी अथवा व्यक्तींचा सहभाग निष्पन्न झाल्यास त्यांची चौकशी करण्यासाठी दोन्ही आरोपींचा पुन्हा पोलीस कोठडी रिमांड घेण्याचा अधिकार तपास यंत्रणेने राखून ठेवला होता.
तपासात किनवट येथील ॲक्सिस बँकेतील केंद्रीय सहाय्य योजना, आदिम जमाती योजना आणि कलम 275/1 या तीन खात्यांतून सुमारे 2 कोटी 13 लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. 42 लाभार्थ्यांच्या नावावर 45 आर्थिक नोंदी करण्यात आल्या. यापैकी 28 लाख 62 हजार रुपये संतोष मारपवार याच्या खात्यावर, तर 90 हजार रुपये भगवान डवरे याच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यापूर्वी 2023 या आर्थिक वर्षातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातील 18 नोंदींतून 1 कोटी 8 लाख 40 हजार 2 रुपयांचे संशयास्पद व्यवहार उघड झाले होते. आता नव्या आर्थिक व्यवहारांमुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पुढील तपास करीत आहे.



