Uncategorized

शासनाने महावितरणचे खाजगीकरण करू नये – इसा खान

किनवट (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाने महावितरण कंपनीचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १२ वाजल्यापासून महावितरणचे सर्व कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर गेले आहेत.
माजी नगराध्यक्ष ईसा खान सरदार खान यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवत सांगितले की, “जर महावितरणचे खाजगीकरण झाले, तर त्याचा सर्वात मोठा फटका विज ग्राहकांना बसणार आहे. गरीब, शेतकरी, व्यापारी, छोटे कारखानदार, लघुउद्योजक आणि कामगार वर्गावर संकट कोसळेल.”
त्यांनी पुढे सांगितले की, खाजगीकरणानंतर कंपनीचा मनमानी कारभार सुरू होईल, विजेचे दर प्रचंड वाढतील आणि सामान्य जनता हैराण होईल. खाजगी कंपनी आपल्या मनाप्रमाणे कर्मचारी कपात करेल, नवीन भरती तुटपुंज्या पगारावर करेल आणि कर्मचाऱ्यांची स्थिती बीएसएनएल कंपनीप्रमाणे होईल.
“त्यामुळे माझी शासनाला नम्र विनंती आहे की, महावितरणचे खाजगीकरण करू नये,” असे आवाहन इसा खान यांनी केले.
महावितरण कर्मचारी संघटनेने जाहीर केलेल्या तीन दिवसांच्या संपाला पाठिंबा दर्शवत इसा खान म्हणाले, “मी आणि किनवटमधील सर्व जनता कर्मचारी संघटनेच्या ठाम पाठीशी आहोत.”

Related Articles

Back to top button